श्री देवदेवेश्र्वर संस्थान पर्वती व कोथरूड अंतर्गत श्री सिध्दिविनायक गणपती मंदिर सारसबाग श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीच्या पायथ्याशी आंबील ओढयाच्या सीमेवर बांध घालून पुणे शहरामधे येणारे पाणी अडवून पर्वती टेकडीच्या पायथ्या पासून सध्याच्या हिराबागे पर्यंत सुमारे 25 एकर जमीन खोदून कृत्रिम तलाव निर्माण केला. या तलावाच्या मध्यभागी सुमारे 25000 चौ.फूट आकाराचे बेट तलाव खोदतांनाच राखून ठेवले. या बेटावर नंतर सुंदर बाग करण्यात आली व त्या बागेला सारसबाग असे काव्यात्मक नाव देण्यात आले. श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी येथे मंदिर बांधून जेष्ठ शुध्द पंचमी शके 1706 (इ.स.1784) या दिवशी आपले उपास्य दैवत श्री सिध्दिविनायक गजाननाची प्रतिष्ठापना केली. पेशवाई नंतर स्वातंत्रपूर्व काळात इ.स. 1861 च्या सुमारास मुंबई सरकारने तलावातील बेट सोडून तलावाची जागा पुणे नगर पालिकेकडे सुपुर्द केली| नगरपालिकेने तलावाची निगा नीट राहिना या कारणास्तव तलाव बुजवून तळ्याचे उद्यानात रूपांतर केले. श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधलेले मंदिर अगदीच छोटे होते. तलावाचे उद्यानात झालेले रूपांतर त्यामुळे श्री सिध्दिविनायकाच्या दर्शनास येर्णाया भक्तांचीही गर्दी वाढू लागली. अशा परिस्थितीत मंदिराची जागा अपुरी पडू लागली.या गोष्टीची विश्र्वस्त मंडळाने दखल घेऊन श्री सिध्दिविनायकाच्या मंदिराच्या दुरूस्तीचे काम हाती घेऊन हल्लीचे भव्य व सुंदर मंदिर दि.20.03.1977 रोजी पुर्ण केले. मंदिराचे शिखर उभट निमुळते चौकोनी हिंदू पध्दतीचे करण्यात आले आहे.मुळचे शिखर सुमारे 20 फूट उंचीचे होते.ते या शिखराच्या आत तसेच ठेवण्यात आले आहे. या मंदिरात लहान मोठया आकाराच्या अडूसष्ठ कमानी आहेत. त्याचे वैशिष्ठ म्हणजे त्या धनुष्यबाणाच्या आकारा सारख्या असून कमानीचे खुर डौलदार फणा उभारलेल्या नागाचे आहेत|धनुष्य बाण व नाग ही हिंदू संस्कॄतीची प्रतीके आहेत.मंदिर पूर्वाभिमुख असून गाभारा बंद असतांना ‘श्रीं’ चे दर्शन व्हावे या करीता गर्भागाराच्या उत्तर व दक्षिण बाजूस दरवाजे ठेवण्यात आले आहेत.उपलब्ध माहिती प्रमाणे त्या वेळी या मंदिराच्या बांधकामावर अंदाजे रू 6 लाख खर्च झाला आहे.मुख्य मंदिर राजस्थाना मधील गुलाबी रंगाच्या दगडात बांधण्यात आले आहे. श्री सिध्दिविनायकाचे मंदिरात येताच गांभीर्य ,उदात्तता, कलात्मकता यांचा साक्षात्कार होतो.साधेपणातील सौदर्य डोळ्यात भरते.धार्मिक भावना आणि श्री सिध्दिविनायका बद्दलची भक्ती बहरून येते.